Sunday, 15 November 2015

प्रेम म्हंटल तर सोपं, म्हंटल तर कठीण.

प्रेम म्हंटल तर सोपं, म्हंटल तर कठीण. तुम्ही या भावनेला किती महत्व देता यावरच खरतर सार काही अवलंबून आहे. एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते ही भावनाच खरतर गोड आहे, नाही का? काही लोकांना प्रेम मिळतं पण त्यांना त्याची किंमत नसते आणि ज्यांना प्रेम मिळत नाही त्यांना त्याची किंमत असून ती पटवून द्यायला हक्काची व्यक्ती नसते. दोन व्यक्तींचं एकमेकांवर भरपूर प्रेम असाव , एकमेकांची काळजी घ्यावी, काय हवं नको ते बघावं. कधी मानसिकरित्या, कधी भावनिकरित्या जशी वेळ असेल त्या क्षणी ठाम पणे त्या व्यक्ती सोबत उभ राहाव. हे इतकच काय ते लागत नात बहरायला आणि टिकवायला. हो अगदी इतकंच!मग बाकीच्या कठीण गोष्टी आपोआप सुरळीत होतात. जगाच्या पाठीवर काहीही उलथा पालथ होउदे, माझी हक्काची व्यत्की माझ्या सोबत राहणारच, ही जी भावना आहे ना ती कितीही करोडपती असलात तरी विकत घेत येणार नाही कारण ती व्यक्तीच लाख मोलाची असते जी सगळ्यांना कडे Available नसते. हल्ली झालय असं की आपल्याला प्रेम हवं असतं मात्र आपल्या कडून फार अपेक्षा केलेल्या ही आपल्याला चालत नाहीत. मग कधी तरी Self respect तर कधी Ego तर कधी My own space ही सगळी पात्र आपले Role पार पडायला बाहेर येतात. पण मुळात प्रेमात पडताना या गोष्टी होत्या का आपल्यात? ज्या आता प्रेम जगताना आडव्या येतायत. सरळ सोपं आहे सगळ उगाच कठीण करून घेतो आपण. आई वर प्रेम करतोच ना आपण, तेव्हा Self Respect आडवा येतो का? नाही ना? मग जोडीदर त्या जागी असला की का ह्या सगळ्या पताक्यांची रांग लागते ? जर एखादी मुलगी तुमची आई, मैत्रीण,मित्र,शिक्षिका प्रेयसी किंवा एखादा मुलगा तुमच्या मागे ठाम पणे वाडील, मित्र , शिक्षक आणि प्रियकर हे सगळे Roles पार पाडत असेल, तर जपा…. त्या व्यक्तीला खरच जपा. कारण आजकाल प्रेम या भावनेला अनेक फाटे फुटलेत आणि खरी भावना दुर्मिळ होत चाललीये आणि त्यासोबत खर प्रेम करणारी माणसं ही. कालच एक प्रसंग घडला. सांगायला आवडेल कारण प्रेमाशीच निगडीत आहे. आमच्या शेजारीच एक जोडप आहे, एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून जीवाचा आटापिटा करून घरातल्यांना आपल प्रेम पटून देऊन सर्वांच्या सक्षीने लग्न करून सुखाने नांदत होते. आता सासू या प्रजाती बद्दल मी काय बोलणार? जग जाहीर आहे सगळ काही. नाही अपवाद नक्कीच असतील, त्या अपवाद वाल्या ग्रुप ची मी Member असेन हे मात्र नक्की आणि त्यातली एक Member माझी सासू व्हावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना ;) तर अश्या या आनंदी जोडप्याच्या आयुष्यात थोडे फार वाईट प्रसंग आले. सगळेच दिवस सारखे नसतात हो!तर त्या दिवशी या सासू सुनेचे वाद हे कारण पुढचं महाभारत घडायला फार होतं. दोघी ही महाभयंकर हट्टी आणि आमच्या कहाणीतली ही नायिका वाद झाले म्हणून सरळ माहेरी निघून गेली . चक्क नवऱ्याला न सांगता… आता एकमेकांवर इतका प्रेम आहे अस म्हणणाऱ्या या जोडप्या मधंल्या एका व्यातकी ने असं का वागावं? आपल्या हक्क्च्या व्यक्ती शी चर्चा न करता सरळ निघून जाव? तो घरी परतल्या वर आपण त्याला या घरात दिसणार नाही म्हंटल्या वर तो कावरा बावरा होईल इतका साधा सरळ विचार येऊ नये मनात? आता तुम्ही म्हणाल तुझ लग्न झाल नाही म्हणून तुला बोलण सोपं आहे, जसं आमची ही नायिका मला नेहमीच मी तिला समजवायला गेले की बोलते. तसं असेल ही. बदलत असतील ही गोष्टी. अरे पण तुम्ही तेच आहात ना? आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे अस ठाम पणे आपल्या आईवडिलांना सांगणारे. मग इतक तकलादू होत का तुमचं प्रेम? की एकमेकांना न सांगता परस्पर टोकाचे निर्णय घेतले जावेत. आपल्या व्यक्तीचा विचार न करता? कदाचित ही पोस्ट वाचली की कळेल या जोडप्याला मला काय म्हणायचंय ते. मला फार काही कळत प्रेमातलं असा भाग नाही पण जे काही अनुभव आलेत त्यावरून इतकं कळलं की दोन हक्काच्या व्यक्तींनी एकमेकाची साथ कधीच सोडू नये. कारण सारं जग सोबत नसेल तरी चालत ओ पण आपलं छप्पर आपल्या डोक्यावरून निघून गेलं की पाया खालची जमीन ही आपली राहत नाही. म्हंटल ना बघायला गेलात तर खूपच सोपं आणि बघायला गेलात तर खूपच कठीण. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन महत्वाचा! माणसाने आपल्या मेंदू ला असं काही trained केलंय की तो सगळ्याच गोष्टीना गृहीत धरायला लागतो पण आज आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी ही व्यक्ती, सतत साथ देणारी व्यक्ती आणखी दोन वर्षांनी आपल्या सोबत नसेल तर आयुष्य कसं असेल? विचार करा, उत्तर तुम्हालाच सापडेल. जर तुमच्या आसपास असे मित्र/मैत्रिणी किंवा हक्काची व्यक्ती असेल जी तुमच्या वर निखळ प्रेम करत असेल, तर या माणसांना जपा. कारण सागळेच आपल्या सारखे नशीबवान नसतात. आता तुम्हीच ठरवा हे सोपं की कठीण?